खैरे-दानवे वाद : ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या भूमिकेकडे लक्ष

Foto

मोठ्यांच्या वादात भरडले जाण्याची सैनिकांना भीती

 शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योग तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई आज शहरात आहेत. एमआयडीसीने विक्रमी वेळेत उभारलेल्या कोविड रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज ऑनलाईनद्वारे होणार आहे. त्यानिमित्ताने देसाई शहरात आले असले तरी त्यांचा संघटनात्मक अधिकार, अनुभव आणि आतापर्यंत त्यांनी संघटनेसाठी खाल्लेल्या खस्ता पाहता त्यांनी खैरे-दानवे यांच्या वादावर तोडगा काढावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांकडून व्यक्‍त केली जात आहे. मोठ्यांच्या भांडणात शहर पातळीवर काम करणार्‍या कार्यकर्त्यांची कुचंबणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुभाष देसाई यांनी हा तिढा सोडवावा, असे स्थानिक शिवसैनिकांना वाटते.

मुंबई बाहेरील शिवसेनेची पहिली शाखा 8 जून 1985 रोजी शहरातील गुलमंडीवर स्थापन झाली आणि नंतर शिवसेनेने मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात तुफानी घोडदौड करत इतिहास घडवला. महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीच्या निमित्ताने 1988 मध्ये सुरू झालेला शिवसेनेचा अश्‍वमेध 2019च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मानाने दौडत होता. विशेष म्हणजे 1988 च्या पहिल्या निवडणुकीपासून सुभाष देसाई या शहराशी आणि शहरातील संघटनेशी जोडले गेलेले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मे 1988 मध्ये झालेल्या पहिल्या सभेचे खरे सूत्रधार सुभाष देसाईच होते, असे म्हटले तर वावगे होणार नाही. 
शिवसेनेच्या शहर शाखेच्या 35 व्या वर्धापन दिनी परवा संघटनेत सरळ सरळ बेबनाव असल्याचे समोर आले. स्थापनेपासून संघटनेशी संबंधितच नव्हे तर कायम अग्रभागी राहिलेले माजी खासदार, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि  भाजपमधून 1998 मध्ये शिवसेनेत येऊन अत्यंत कमी वेळात स्वतःचे स्थान आणि महत्त्व निर्माण करणारे जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे या दोन मातब्बर नेत्यांमध्ये वर्चस्वाच्या वादातून संघटनेत उघड उघड दुफळी निर्माण झाली आहे. महानगरपालिका निवडणुका अजून होणार असल्यामुळे या दोन बड्यांच्या वादाचा परिणाम सर्वसामान्य शिवसैनिकांना भोगावा लागणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सुभाष देसाईसारख्या ज्येष्ठ नेत्यांनीच या वादात हस्तक्षेप करून त्याचे निरसन करावे आणि सर्वसामान्य शिवसैनिकांबरोबरच शहरवासीयांनाही दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे.